शरद पवारांचा पक्ष फोडण्यात अदानींच्या भावाचा सहभाग, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Foto
पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती येथे आज (रविवार) अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते मशरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सफ या केंद्राचे उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गौतम अदानी आणि पवार कुटुंबातील सर्व दिग्गज नेते पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसून आले आहेत. काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्या संबंधांवर सतत टीका होत असतानाच शरद पवार आणि गौतम अदानी एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले असून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केलाय.
 
संजय राऊत म्हणाले की, मुंबईवर मोदींचा आणि भाजपचा मित्र ज्या पद्धतीने ताबा मिळवत आहे, त्याला आमचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे. गौतम अदानी यांना मुंबईला ताब्यात घेण्याच्या विरोधात मुंबईची लढाई आहे. भारतीय जनता पक्षाच्या मदतीने मुंबई गिळण्याचा प्रयत्न होत आहे. ते उद्योगपती आहेत. पण गौतम अदानींसारखा हव्यास इतर उद्योगपतींनी मुंबईच्या बाबतीत दाखवल्याचे दिसून येत नाही. टाटा, बिर्ला, अंबानी यांच्यासह अनेक उद्योगपती या मुंबईमध्ये आलेत. पण ज्या पद्धतीने अदानींना मुंबई गिळण्यासाठी उत्तेजन दिले जात आहे, हे मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
 
संजय राऊत पुढे म्हणाले की, शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध राजकीय नाहीत. कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहेत. आपल्या कार्यक्रमाला कुणाला बोलवायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यांनी गौतम अदाणींना बोलावलं असेल आणि त्यासाठी पवारांचे संपूर्ण कुटुंब ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवार सुद्धा उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानींच्या भावाचा सहभाग होता, अशी माझी ऐकीव माहिती आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. तर रोहित पवारांनी अदानींच्या गाडीचं सारथ्य का केलं, हे त्यांनाच विचारा, असे देखील संजय राऊत म्हणाले.